वाशीत ‘ऑपरेशन अभ्यास’ यशस्वी
- by Aajchi Navi Mumbai
- May 14, 2025
- 173
आपत्कालीन तयारीची प्रात्यक्षिके प्रभावीपणे सादर
ठाणे : केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित करण्यात आलेले आपत्कालीन परिस्थितीसाठीच्या सज्जतेचे परीक्षण करणारे ‘ऑपरेशन अभ्यास’ हे मॉक ड्रिल दि. 13 मे 2025 रोजी नवी मुंबईतील वाशी येथील सेक्टर 12 मधील नीलसिद्धी टॉवर च्या प्रांगणात उत्साहात यशस्वीरित्या पार पडले. दुपारी 4.30 वाजता सायरन वाजवून या मॉक ड्रिलची सुरुवात झाली आणि त्यानंतर पूर्वनियोजित घटनाक्रमाप्रमाणे सर्व प्रात्यक्षिके अत्यंत प्रभावीपणे सादर केली.
जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने व प्रांताधिकारी उर्मिला पाटील, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसिलदार उमेश पाटील, श्री.फडतरे, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, उपमुख्य क्षेत्ररक्षक बिमल नथवाणी, कमलेश श्रीवास्तव, विभागीय क्षेत्ररक्षक अयुब शिकलगार, जगीर खान, शकुंतला राय, बुद्धदास जाधव, अरुण सातपुते, प्रमोदिनी जाधव, भुजबळ, मानसेवी निदेशक डॉ.प्रकाश ठमके यांच्या सक्रिय पुढाकारातून हे मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले होते. मॉक ड्रिलच्या दरम्यान, काल्पनिक परिस्थितीत एअर स्ट्राईक/बॉम्ब हल्ल्याची सूचना देण्यात आली. यानंतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी त्वरित सूचनांचे प्रसारण करण्यात आले. नागरिकांनी कोणताही गोंधळ अथवा धावपळ न करता शांतपणे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन केले आणि सुरक्षितस्थळी आश्रय घेतला. त्यानंतर, संबंधित परिसरात शोध मोहीम राबवून 20 जखमी नागरिकांना तात्काळ प्रथमोपचार देण्यात आले. इमारतीत अडकलेल्या अन्य 5 नागरिकांची अग्निशमन दलाच्या सहाय्याने सुटका करण्यात आली आणि त्यांना प्रथमोपचार पुरविण्यात आले.
या संपूर्ण कार्यवाहीदरम्यान, सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत गांभीर्याने सहभाग घेतला आणि केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले. मॉक ड्रिलदरम्यान कुठल्याही प्रकारची अफवा पसरली नाही आणि नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला. मॉक ड्रिलच्या यशस्वी समारोपानंतर नागरी संरक्षण दलाचे माजी अतिरिक्त नियंत्रक धैर्यशील जाधव, नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रण विजय जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करीत या मॉक ड्रिलचे, नागरी संरक्षण आणि होमगार्ड संघटनांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, हे मॉक ड्रिल केवळ आपत्कालीन परिस्थितीत आपली तयारी किती आहे, हे तपासण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. कोणतीही खरी आपत्ती ओढवलेली नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. त्यांनी नागरिकांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. या महत्त्वपूर्ण मॉक ड्रिलच्या वेळी नवी मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव, तहसिलदार फडतरे, उपायुक्त सोमनाथ पोटरे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव, वाशी सहाय्यक आयुक्त अलका महापूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, साळवी, नवी मुंबई विशेष शाखेचे चंद्रशेखर वक्ते यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच नीलसिद्धी टॉवर चे अध्यक्ष राजू अहुजा, सचिव जसजित मुंडे, खजिनदार विनोद बाफना, कार्यकारणी सदस्य शिल्पा आरोंदेकर आदी उपस्थित होते.
एकंदरीत, ‘ऑपरेशन अभ्यास’ हे मॉक ड्रिल वाशी शहरात अत्यंत यशस्वीरित्या पार पडले आणि यातून आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाची आणि नागरिकांची सज्जता प्रभावी असल्याचे दिसून आले. या संपूर्ण मॉक ड्रिल मध्ये महसूल, आरोग्य, पोलीस, नागरी संरक्षण दल, होमगार्ड, ठाणे महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन, टीडीआरएफ चे जवान, अग्निशमन दल, नील सिद्धी टॉवरचे सुरक्षा रक्षक आणि तेथील नागरिक या सर्वांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai