मेघ बसरले धरण भरले
- by Aajchi Navi Mumbai
- May 31, 2025
- 437
या आठवड्यात राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला. मान्सुनचे आगमनही मेघगर्जनेच्या धुमधडाक्याने झाले. मे महिन्याच्या अखेरीस जोरदार मेघ बसरल्याने धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. काह धरणे पहिल्यांदाच मे महिन्यात पुर्ण क्षमतेने भरली आहेत. महाराष्ट्रातील अनेक लहान मोठ्या धरणांची हीच परिस्थिती बघायला मिळत आहे. उरणचे रानसई, पनवेलचे देहरंग, नवी मुंबईचे मोरबे या तीनही धरणातील पाणीसाठी वाढल्याने पनवेल, नवी मुंबई व उरणकरांना दिलासा मिळाला आहे.
रानसईच्या पाणी पातळीत वाढ
उरण : सोमवार पासून उरणच्या रानसई धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. 116 फूट उंचीच्या धरणात मे महिन्यात अवघे 90 फुटांवर पाणी होते. पावसाने ही पातळी गुरुवारी 96.6 वर आणली आहे. मात्र त्यानंतरही एमआयडीसीकडून करण्यात आलेली मंगळवार व शुक्रवार या दोन दिवसांची पाणीकपात कायम आहे. त्यामुळे या पावसाने येथील नागरिकांना दिलासा मिळालेला नाही.
उन्हाळ्यात रानसई धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागला होता. धरणात जूनअखेरपर्यंत पुरवठा करता येईल इतकाच पाणी साठा उपलब्ध आहे. रानसई धरणातील पाणी साठवणूक क्षमता वाढत नसल्याने उरणच्या नागरिकांवर पाणीकपातीचे संकट वाढू लागले आहे. रानसई धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी झाली असल्याने धरणातून पावसाळ्यातील साडेतीन महिन्याचे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांना ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापासूनच वर्षोनुवर्षे पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. धरणाची पाणी क्षमता वाढविण्यासाठी एमआयडीसीने तयार केलेला प्रस्ताव अनेकवर्षे धूळखात बसला आहे.
उरण तालुक्यातील नागरिकांना व येथील उद्योगासाठी लागणारे पाणी एमआयडीसीच्या रानसई धरणातून पुरविले जात असून उरणकराइना दररोज 41 दश लक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र एमआयडीसीकडे केवळ 30 दश लक्ष लिटर पाणीच असल्याने दररोज 10 दश लक्ष लिटर पाणी कमी पडत असल्याने हा पाणी पुरवठा जून महिन्यापर्यंत करता यावा यासाठी पाणीकपात केली जात आहे.
रानसई धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मात्र एमआयडीसीकडून सुरू असलेली पाणी कपात रद्द करण्याचा विचार सुरू आहे. मात्र पावसाचा अंदाज पाहून या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असे उरण एमआयडीसीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
- मोरबे धरणात सर्वाधिक जलसाठा
नवी मुंबई : मोरबे धरण परिसरात आतापर्यंत 417 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शहराला सुमारे चार दिवसपाणीपुरवठा करता येईल इतका पाणीसाठा वाढला आहे. स्वतःच्या मालकीचे धरण असलेल्या व जलसंपन्न शहर संबोधल्या जाणाऱ्या नवी मुंबईला महापालिकेच्या मोरबे धरणात मागील तीन वर्षांतील सर्वाधिक जलसाठा यंदा शिल्लक आहे. धरणात सद्यस्थितीला 40.77 टक्के जलसाठा शिल्लक असून याद्वारे पुढील 97 दिवस म्हणजेच 3 सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा करता येणार आहे.
मोरबे धरण गेल्यावष 28 ऑगस्ट 2024 ला 100 टक्के भरले होते व धरणातून पाण्याचा विसर्गही करण्यात आला होता. महामुंबईत होऊ घातलेल्या व आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे दिवसेंदिवस अतिशय सुनियोजित असलेल्या शहराचा दर्जा आणखी वाढत जाऊ लागला आहे. परंतु नवी मुंबई /महापालिकेच्या लोकसंख्येच्या मानाने धरणातून अधिक पाणीउपसा केला जात आहे. त्यामुळे पालिकेने पाणी उपशावरही नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. गेल्यावष मोरबे धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरण 100 टक्के भरले होते. यंदाही पावसाने लवकर सुरुवात केली आहे. गेल्या वषच्या तुलनेत अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. नागरिकांनीही पाण्याचा योग्य वापर करावा. यंदाही धरण 100 टक्के भरेल, अशी आशा आहे.- अरविंद शिंदे
- देहरंग धरण तुडुंब भरले
पनवेल : पनवेल शहराची तहान भागविणाऱ्या देहरंग धरण क्षेत्रात सोमवारी पडलेल्या मुसळधारांमुळे धरण तुडुंब भरले आणि पनवेलकरांचा पाणीप्रश्न मिटला. पनवेलकर मार्च महिन्यापासून आठवड्याला एक दिवसाच्या पाणीकपातीचा सामना करत आहे. ही पाणीकपात जून महिन्यापर्यंत सुरू राहणार होती. मात्र धरण तुडुंब झाल्याने सोमवारपासून पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय पनवेल महापालिका आयुक्तांनी घेऊन पनवेलकरांना दिलासा दिला आहे. मे महिन्यात पहिल्यांदाच एवढा पाऊस पडल्यामुळे धरण मे महिन्यातर आकंठ भरण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे येथील स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
दरवर्षी मोसमाच्या पावसानंतर जून अखेरपर्यंत देहरंग धरण तुडुंब भरुन वाहू लागते. या धरणाची क्षमता 3.125 घन लक्ष मीटर आहे. या धरणातून पनवेल /शहराला दररोज 16 दश लक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. पनवेलकरांची तहान भागविण्यासाठी 32 दश लक्ष लीटर पाण्याची गरज आहे. महापालिका प्रशासन देहरंग व्यतिरिक्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून उसनवारीने पाणी घेऊन शहराची तहान भागवते. सोमवारी एका दिवसात 296 मिलीमीटर पाऊस पनवेल परिसरामध्ये पडल्याने धरण तुडुंब भरुन वाहू लागले.
देहरंग धरणातील पाणी जून महिन्यापर्यंत पनवेल शहरासाठी घेता यावे यासाठी महापालिका प्रशासनाने मार्च महिन्यापासून दिवसाला 4 ते 5 दश लक्ष लीटर पाणी घेण्याचे नियोजन केले. पाण्याच्या नियोजनामुळे मार्च महिन्यापासून पाणी कपात लागू केल्यामुळे एमजेपीकडून वाढीव पाणी पुरवठा पनवेल शहराला केला जात होता. सोमवारी मुसळधार धरण क्षेत्रात कोसळल्यामुळे हा पाऊस पनवेलकरांसाठी आनंदवार्ता घेऊन येणारा ठरला.
सोमवारी पडलेल्या पावसामुळे पनवेलकरांची पाणी टंचाई दूर झाली. सोमवारपासून पाणी कपात पालिकेने रद्द केली आहे. नागरिकांनी पालिकेचे आभार मानले आणि टंचाईच्या काळात नागरिकांचे सहकार्य महापालिका प्रशासनाला लाभल्याने त्यांचेही आभार पालिका मानते. विलास चव्हाण, उप अभियंता, पाणी पुरवठा विभाग, पनवेल महापालिका
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai