पुनर्विकास सल्लागारासाठी मार्गदर्शक तत्वांची गरज
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 08, 2025
- 463
नवी मुंबई विकासकांची सिडको व पालिकेकडे मागणी
नवी मुंबई : सिडको व नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पुनर्विकासाने बाळसे धरले आहे. पुनर्विकास प्रकल्प सल्लागाराच्या माध्यमातून करावा अशी अट सह निंबधक सहकारी संस्था यांनी घातली आहे. विकासकांना पुनर्विकास प्रकल्प कथित सल्लागारांमार्फत राबवावा लागत असल्याने आणि सल्लागारांची कोणतीही जबाबदारी निश्चित नसल्याने त्याचा मोठा फटका प्रकल्पातील भागधारकांना बसत आहे. या पार्श्वभुमीवर सिडको व महापालिकेने पुनर्विकास प्रकल्पासाठी नेमण्यात येणाऱ्या सल्लागारंसाठी मार्गदर्शक तत्वे आणि अर्हता जाहीर करावी अशी मागणी नवी मुंबईतील नामवंत विकासक नलीन शर्मा यांनी केली आहे.
नवी मुंबईत सध्या पुनर्विकासाने जोर धरला आहे. गेल्या चार वर्षात अनेक प्रकल्पांना बांधकाम परवानग्या नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका व सिडकोने दिल्या असून सदर प्रकल्पांचे बांधकाम मार्गी लागले आहे. सहनिंबधक सहकारी संस्था यांनी पुनर्विकास प्रकल्प सल्लागारामार्फत राबवावा अशी अट ना हरकत दाखला देताना घातली आहे. या अटीमुळे नवी मुंबईत कथित सल्लागारांचे पेव फुटले असून अनेकांनी स्थानिक राजकर्त्यांच्या माध्यमातून आपली दुकाने नवी मुंबईत थाटली आहेत. या सल्लागारांसाठी कोणतीही मार्गदर्शक तत्वे वा त्यांच्या नेमणुकीसाठी अर्हता जाहीर केली नसल्याने सल्लागारांचे सध्या फावले आहे. एखादा प्रकल्प पुनर्विकासासाठी उत्सुक असल्यास चुकीची आश्वासने या सल्लागारांमार्फत सोसायटी सदस्यांना देण्यात येऊन सदर प्रकल्प आपल्या मर्जीतील विकासकास कसा मिळेल हे या सल्लागारांमार्फत पाहिले जात आहे. त्यामुळे एखादा चुकीचा विकासक निवडला गेल्यास संपुर्ण प्रकल्प धोक्यात येऊन भागधारकांना मोठा फटका बसू शकतो.
नवी मुंबईतील विकासक नलीन शर्मा यांनी नवी मुंबई महापालिका व सिडको व्यवस्थापकीय संचालक यांना याबाबत पत्र लिहून संभाव्य धोक्याबाबत अवगत केले आहे. संबंधित सल्लागार हे चुकीच्या पद्धतीने भागधारकांना आश्वासन देऊन त्यांच्या मर्जीतील विकासकांनाच प्राधान्य देत आहेत. प्रकल्पाची व्यवहार्यता याला प्राधान्य दिले जात नसून फक्त विकासक निवडणे यालाच महत्व दिले जात आहे. या सल्लागारांचे शुल्कही निश्चित होणे गरजेचे असून कामाच्या पुर्णतेबाबत त्यांची जबाबदारी निश्चित होणे गरजेचे असल्याचे त्यांनी दोन्ही प्राधिकरणांना कळवले आहे. संपुर्ण प्रकल्पात सल्लागाराचे दायित्व निश्चित नसल्याने याबाबत ठोस मार्गदर्शक तत्वे व सल्लागारच्या नियुक्तीची अर्हता कायम करणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात कोणतेही संकट भागधारकांपुढे उभे ठाकू नये म्हणून दोन्ही प्राधिकरणांनी पुनर्विकास सल्लागाराची मार्गदर्शक तत्वे व त्यांच्या निवडीची निकषे कायम करावी अशी मागणी शर्मा यांनी केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai