पालिका करणार अभिजात मराठी भाषेचा जागर
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 04, 2025
- 127
3 ते 9 ऑक्टोबर कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
नवी मुंबई ः मागील वर्षी 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर झाला आणि मराठी भाषेचा गौरव अधिकच वृध्दींगत झाला. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार संपूर्ण राज्यभरात 3 ऑक्टोबर रोजी ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ आणि दि. 3 ते 9 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून नवी मुंबई पालिकेच्या वतीनेही अभिजात मराठी भाषेचा गौरव वाढविणारे व मराठी भाषेच्या अभिजाततेची ओळख करून देणारे विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
शुक्रवार दि. 3 ऑक्टोबर 2025 रोजी अभिजात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून साहित्य अकादमी, नवी दिल्लीचे शासकीय सदस्य तथा सुप्रसिध्द साहित्यिक, व्याख्याते डॉ. प्रा. नरेंद्र पाठक यांचे ‘अभिजात मराठी अभिमान मराठी’ या विषयावर सकाळी 11.00 वाजता महापालिका मुख्यालयात तिसऱ्या मजल्यावरील ज्ञानकेंद्रात व्याख्यान संपन्न होणार आहे. त्याचप्रमाणे भाषेतील शुध्दलेखनाचे महत्व लक्षात घेऊन ‘अभिजात मराठीचे शुध्दलेखन’ या विषयावर लेखक, गज़लकार श्री. जनार्दन म्हात्रे हे 07 ऑक्टोबर (मंगळवार) रोजी सकाळी 11.00 वाजता सादरीकरणाव्दारे सुसंवाद साधणार आहेत.
मराठी भाषा आणि साहित्य विषयक ‘प्रश्नमंजुषा स्पर्धा’ हा अभिनव उपक्रम 8 ऑक्टोबर (बुधवार) रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये नमुंमपा अधिकारी, कर्मचारी त्याचप्रमाणे साहित्यप्रेमी नागरिकही सहभागी होऊ शकतात. या उपक्रमांतर्गत उपस्थितांना मराठी भाषा व साहित्य विषयक प्रश्न विचारले जाणार असून कार्यक्रमस्थळी उपस्थित असणाऱ्या श्रोत्यांमधून योग्य उत्तरे देणाऱ्या श्रोत्यास त्याचवेळी पुस्तक स्वरुपात पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. अशाच प्रकारचा आणखी एक ‘काव्यवाचन स्पर्धा’ हा अभिनव उपक्रम 09 ऑक्टोबर (गुरुवार) रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आला असून यामध्ये स्वत:च्या नव्हे तर अभिजात मराठी भाषेतील नामवंत कवींच्या आपल्याला आवडलेल्या एका कवितेचे कमाल पाच मिनीटात सादरीकरण करावयाचे आहे. या परकाव्यवाचन स्पर्धेच्या माध्यमातून अभिजात मराठी कवितेची समृद्ध परंपरा मांडली जाईल व याव्दारे मराठी भाषेचे वैभव आणि वैविध्यपूर्ण शब्दलालित्य प्रसारित होईल अशी संकल्पना आहे. या स्पर्धांमधील सहभागाकरिता दि. 6 ऑक्टोबर 2025 पर्यंत 9920378574 किंवा 9930020814 या संपर्कध्वनी क्रमांकावर नाव नोंदणी करणे आवश्यक राहील. ऐनवेळी स्पर्धा प्रवेश दिला जाणार नाही
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai