कचऱ्यातील भाजी, फळे पुन्हा विक्रीला
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 01, 2026
- 19
नवी मुंबई : एपीएमसी फळ बाजार आणि भाजी मार्केट मधील विक्रीयोग्य नसलेला माल कचऱ्यात टाकण्यात येतो. मात्र हाच माल गोळा करुन काही जण एपीएमसी आवाराबाहेर व अन्य ठिकाणी विकत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून अशा प्रकारांवर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
पावसामुळे घाऊक फळबाजारातील व्यवहारांवर परिणाम झाला आहे. किरकोळ व्यापाऱ्यांची उपस्थिती घटल्याने मोठ्या प्रमाणात फळे व भाजी पडून राहतात. पावसामुळे खराब झालेली किंवा निर्यातीसाठी अयोग्य ठरलेली फळे, भाजी व्यापाऱ्यांकडून कचऱ्यात टाकली जातात. मात्र यानंतर बाहेरून चांगली दिसणारी फळे काहीजण वेचून पोत्यांमध्ये भरून बाजार समितीच्या आवाराबाहेर नेत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. या फळांची एपीएमसी परिसरातील पदपथांवर तसेच मुंबई, ठाणे आणि परिसरातील काही किरकोळ बाजारपेठांमध्ये कमी दरात विक्री होत असल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात आहे. या घटनेमुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा गंभीर विषय ठरू शकतो. बाजारात खराब झालेला माल आल्यास त्याचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला माहिती दिली जाते. त्यानंतर अनेकदा शेतकरी किंवा लहान व्यापारी तो माल फेकून देण्याऐवजी कमी दरात विकण्याचा निर्णय घेतात. मात्र, कचऱ्यात टाकलेला शेतमाल कोणी बाजार समितीच्या आवाराबाहेर नेऊन विक्री करत असेल, तर त्यावर बाजार समितीचे नियंत्रण राहत नाही. अशा प्रकारांवर संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी कारवाई करणे आवश्यक असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.
पावसाळ्याच्या काळात घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि फळे खराब होऊन कचऱ्यात जात असल्याने अशा मालाची विल्हेवाट अधिक प्रभावीपणे लावणे, बाजार परिसरात देखरेख वाढविणे आणि कचऱ्यातील फळे पुन्हा विक्रीस जाणार नाहीत, यासाठी समन्वयाने उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन, नवी मुंबई महापालिका आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकाराची दखल घेऊन वस्तुस्थितीची पडताळणी करावी, अशी अपेक्षा व्यापारी व ग्राहकांकडून व्यक्त होत आहे. एपीएमसी परिसरातील अनधिकृत विक्री रोखण्यासाठी महापालिका, एपीएमसी प्रशासन, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन यांनी समन्वयाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai