डेब्रिज माफियांविरोधात सिडकोची कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 14, 2026
- 29
तब्बल 20 डंपर जप्त
नवी मुंबई : सिडकोच्या मालकीच्या जागांवर बेकायदा राडारोडा टाकणाऱ्या डेब्रिज माफियांविरोधात सिडको, वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत अवघ्या सहा दिवसांत अवैध राडारोड्याची वाहतूक व विल्हेवाट लावणारे तब्बल 20 डंपर पकडण्यात आले असून, संबंधित चालकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
11 ऑगस्टला एकाच दिवशी 16 डंपरवर कारवाई करण्यात आल्याने ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे. सिडकोच्या दक्षता विभागाचे प्रमुख सुरेश मेंगडे आणि नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सिडकोच्या जागांवर कायदेशीर परवानगीशिवाय राडारोडा टाकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल खाडे यांनीही वाहतूक पोलिसांना आवश्यक निर्देश दिल्याने कारवाईला वेग आला आहे. सिडकोने या कारवाईसाठी अभियंत्यांची विशेष रात्रपाळी नियुक्त केली आहे. 6 ऑगस्टला चार, 7 ऑगस्टला एक आणि 11 ऑगस्टला तब्बल 16 डंपर पकडण्यात आले. या वाहनांवर वाशी, उरण, उलवे, खारघर आणि सीबीडी परिसरातील पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 11 ऑगस्टच्या कारवाईत उलवेतील गव्हाण फाटा येथे पाच डंपर, जांभूळपाडा येथील ज्ञानेश्वर यार्ड परिसरात तीन डंपर, गव्हाण फाटा-चिरनेर मार्गावर दोन डंपर, सीबीडी सेक्टर 23 येथे एक डंपर, खारघर सेक्टर 22 येथे एक डंपर आणि वाशी टोलनाक्याजवळ तीन डंपर पकडण्यात आले. याशिवाय विविध ठिकाणी राडारोडा खाली करण्याच्या उद्देशाने आलेल्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली.
सिडको अभियंते, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस आणि सुरक्षा रक्षक यांच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. सिडकोच्या जागांवर होणारी अवैध डेब्रिज वाहतूक आणि विल्हेवाट रोखण्यासाठी ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai