नवी मुंबईत प्लास्टिकमुक्त गणेशोत्सवाचा निर्धार
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 28, 2026
- 36
‘मूर्ती लहान पण भावना महान’ पुरस्काराची घोषणा
गणेश मंडळांसाठी एक खिडकी योजना; 150 हून अधिक कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती
नवी मुंबई : यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि प्लास्टिकमुक्त साजरा करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने जोरदार तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, आरोग्य आणि संस्कृतीविषयक जनजागृती करणारे उपक्रम राबवावेत, असे आवाहन महापौर सुजाता पाटील यांनी गणेशोत्सव मंडळे आणि नागरिकांना केले. तसेच मूर्तीच्या उंचीवरून होणारी स्पर्धा टाळून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मूर्ती लहान पण भावना महान’ या विशेष पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
यंदा 14 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून, त्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका, पोलीस आणि विविध प्राधिकरणांची गणेशोत्सव मंडळांसोबत पूर्वतयारी बैठक महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात झाली. या बैठकीत उत्सवाच्या नियोजनासह वाहतूक, विसर्जन व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यंदाच्या गणेशोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘नवी मुंबई महापौर गणेशदर्शन स्पर्धा 2026’. सार्वजनिक मंडळांसोबतच यंदा घरगुती गणेशोत्सवासाठीही विशेष श्रेणी ठेवण्यात आली आहे. ‘मूर्ती लहान पण भावना महान’ या विशेष पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळाला हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
- मंडळांना शुल्कमाफी, एक खिडकी योजना
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी गणेश मंडळांना पर्यावरणपूरक आणि प्लास्टिकमुक्त उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी आवश्यक परवानग्या मिळविण्यासाठी महापालिकेने एक खिडकी योजना सुरू केली असून, याचा मंडळांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. यंदाही परवानग्यांसाठी मंडळांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती आयुक्तांनी दिली. अनधिकृत बॅनर्समुळे शहराचे विद्रूपीकरण तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मंडळांनी निश्चित केलेल्या जागी आणि आवश्यक परवानगी घेऊनच मर्यादित प्रमाणात बॅनर्स लावावेत, असे आवाहन करण्यात आले. - शाडूच्या मूर्तींना प्राधान्य
गणेश मंडळांनी शाडूच्या मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तींना प्राधान्य द्यावे, तसेच मंडपांमध्ये ओला आणि सुका कचरा संकलनासाठी स्वतंत्र डब्यांची व्यवस्था करावी, असे आयुक्तांनी सांगितले. सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे मा. न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने उभारलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांमध्येच विसर्जन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले. ो150 हून अधिक कृत्रिम विसर्जन तलावगणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाकडून सर्व विसर्जन स्थळांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी यंदा 150 हून अधिक कृत्रिम विसर्जन तलाव निर्माण करण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी वेगाने काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विसर्जन मिरवणुकांच्या मार्गांचे योग्य नियोजन, रस्त्यांवरील स्पीडब्रेकरवर पट्टे मारणे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंगची व्यवस्था, मिरवणूक मार्गातील झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि केबलचा अडथळा दूर करण्याच्या सूचनाही महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीस महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती गिरीश म्हात्रे, नगरसेवक विशाल विचारे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, उपायुक्त संजय शिंदे, स्मिता काळे, डॉ. अजय गडदे, डॉ. राजेश म्हात्रे, अभिलाषा म्हात्रे, परिवहन व्यवस्थापक उमाकांत जंगले, संदेश नाईक यांच्यासह महापालिका, पोलीस आणि विविध प्राधिकरणांचे अधिकारी तसेच 75 हून अधिक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणत्याही अडचणीसाठी संपर्क साधता यावा यासाठी एकच दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले. सर्व प्राधिकरणे, गणेश मंडळे आणि नागरिकांच्या परस्पर सहकार्याने यंदाचा गणेशोत्सव उत्साहात, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai