समर्पित मालवाहतूक मार्गिकेमुळे जेएनपीटीला नवी गती
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 11, 2026
- 31
326 किमीच्या तीन टप्प्यांचे राष्ट्रार्पण; मुंबईहून 250 हून अधिक ट्रक इतका माल एका रेल्वेने वाहून नेणे शक्य
लॉजिस्टिक्स खर्च, वेळ आणि इंधन बचतीसह देशाच्या व्यापाराला मिळणार मोठी चालना : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
रायगड-अलिबाग : पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका पूर्ण झाल्यामुळे देशाच्या मालवाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तन घडत आहे. जेएनपीए बंदरातून डबल-स्टॅक कंटेनर असलेली पहिली मालगाडी मार्गस्थ होणे ही या परिवर्तनातील महत्त्वाची कामगिरी असून, या मार्गिकेमुळे मालवाहतुकीचा वेग आणि क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. एका मालगाडीमधून मुंबईहून 250 पेक्षा अधिक ट्रकइतका माल वेगाने वाहून नेता येणार असल्याने वाहतुकीचा वेळ आणि खर्च दोन्ही कमी होतील. त्यामुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती आणि दिशा मिळेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 326 किमी लांबीच्या आणि 20 हजार 700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या तीन महत्त्वपूर्ण टप्प्यांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आले. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डबल-स्टॅक मालगाडीला हिरवा झेंडा दाखवून ती राष्ट्राला समर्पित करण्यात आली. उरण येथील जेएनपीए येथे झालेल्या कार्यक्रमास राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, रोजगार हमी योजना मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
मालगाड्यांचा वेग वाढणार, प्रवासी रेल्वेलाही फायदा
प्रधानमंत्री मोदी यांनी 2014 नंतर देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मिळालेल्या वेगाचा उल्लेख केला. पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका पूर्ण झाल्यामुळे देशाच्या व्यापारी आणि वाहतूक व्यवस्थेत मूलभूत परिवर्तन घडत असून, ही मार्गिका राष्ट्रीय व्यापाराची महत्त्वपूर्ण आधाररचना ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतंत्र मालवाहतूक मार्गिकेमुळे दररोज 430 हून अधिक मालगाड्या चालविण्याची क्षमता निर्माण होणार आहे. ट्रकने सुमारे 30 तास लागणारा प्रवास आता रेल्वेमार्गे 10 ते 12 तासांत पूर्ण होऊ शकतो. यामुळे इंधनाची बचत, वाहतूक खर्चात घट, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होणे आणि पर्यावरण संरक्षण असे अनेक फायदे होणार असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी नमूद केले. नाशवंत कृषी मालही देशातील मोठ्या बाजारपेठांपर्यंत वेगाने पोहोचविणे शक्य होणार आहे. समर्पित मालवाहतूक नेटवर्कचा कृषी क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे. पूर्व आणि पश्चिम भारतातील शेतकऱ्यांची नाशवंत कृषी उत्पादने मोठ्या बाजारपेठांपर्यंत कमी वेळेत पोहोचविणे शक्य होणार आहे. फुले, फळे आणि भाजीपाला वेळेत बाजारपेठेत पोहोचल्याने शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो, असे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले.
पायाभूत सुविधांमधून रोजगाराच्या संधी
रस्ते, मेट्रो, विमानतळ, गॅस पाइपलाइन आणि रेल्वे यांसारख्या पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीचा व्यापक आर्थिक परिणाम होत असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी स्पष्ट केले. पायाभूत प्रकल्पांमुळे थेट तसेच अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतात. बंदरांचा विस्तार, घरबांधणी आणि औद्योगिक विकासामुळे संबंधित परिसरात नवीन उद्योग-व्यवसायांना चालना मिळते, असे त्यांनी सांगितले.
‘पूर्ण समर्पित मालवाहतूक नेटवर्क’ ऐतिहासिक उपलब्धी
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पूर्व समर्पित मालवाहतूक मार्गिका यापूर्वीच कार्यान्वित झाल्याचे सांगत पश्चिम मार्गिका पूर्ण झाल्यामुळे देशातील संपूर्ण समर्पित मालवाहतूक मार्गिका नेटवर्क पूर्ण झाल्याचे नमूद केले. ही देशाच्या वाहतूक आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने ऐतिहासिक उपलब्धी असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील रायगड, ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांतून सुमारे 178 मार्ग किलोमीटर लांबीची ही मार्गिका जाते. महाराष्ट्रातील या प्रकल्पासाठी जमिनीच्या खर्चासह 10 हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक्स क्षमतेला मोठी चालना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गिकेमुळे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक्स क्षमतेला मोठी चालना मिळणार असल्याचे सांगितले. देशातील सुमारे 55 टक्के कंटेनर वाहतूक हाताळणाऱ्या जेएनपीएला या मार्गिकेचा मोठा फायदा होणार आहे. एप्रिल ते ऑगस्टदरम्यान जेएनपीएने सुमारे 38.27 लाख टीईयू कंटेनर हाताळले असून, मार्गिका पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर ही वाहतूक आणखी वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2030 पर्यंत जेएनपीए हे दशलक्ष टीईयूपेक्षा अधिक क्षमता असलेले देशातील पहिले बंदर ठरेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. दादरी, उत्तर प्रदेश ते जेएनपीए या पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकेतील जेएनपीए ते न्यू उमरगाव हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आता कार्यान्वित होत आहे. सुमारे 1,500 किमी लांबीची ही मार्गिका उत्तर भारताला पश्चिम भारताशी जोडत असून, पश्चिम किनारपट्टीवरील जेएनपीएसारख्या महत्त्वाच्या बंदराचा लाभ देशाच्या मोठ्या भूभागाला मिळणार आहे.
जेएनपीए-वाढवण बंदरामुळे महाराष्ट्राची सागरी ताकद वाढणार
जागतिक पुरवठा साखळीमध्ये भारताला अधिक सक्षम स्थान निर्माण करायचे असल्यास लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करणे आवश्यक आहे. समर्पित मालवाहतूक मार्गिका पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर हा खर्च आणखी कमी होऊन भारताची जागतिक स्पर्धात्मकता वाढेल आणि रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. जेएनपीएच्या विस्तारासोबतच वाढवण बंदराचा विकास सुरू असून, या दोन्ही बंदरांना सक्षम रेल्वे मालवाहतूक जोडणी मिळाल्यामुळे महाराष्ट्राला देशातील महत्त्वाचे मॅरिटाईम पॉवर आणि जागतिक लॉजिस्टिक्स हब म्हणून विकसित करण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी डीएफसीसीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार यांनी पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकेची वैशिष्ट्ये, बांधकामातील अभियांत्रिकी आव्हाने, मार्गिकेची क्षमता आणि जेएनपीएशी झालेल्या जोडणीमुळे मालवाहतुकीला मिळणारी गती याबाबत माहिती दिली. जपानच्या मुंबईस्थित वाणिज्य दूतावासाच्या महावाणिज्यदूत सातो हितोमी यांनी या प्रकल्पाच्या उभारणीत भारत-जपान सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai