पनवेल ते वसई लोकल मार्गाचा प्रस्ताव केंद्रांकडे
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 13, 2026
- 13
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) लाखो प्रवाशांच्या प्रतीक्षेला लवकरच पूर्ण विराम मिळण्याची चिन्हे आहेत. नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांना थेट जोडणाऱ्या अतिशय महत्त्वाकांक्षी पनवेल-वसई उपनगरी रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर या प्रकल्पाचा 12,710 कोटी 82 लाख रुपयांचा सविस्तर आणि अंतिम प्रस्ताव मंजुरीसाठी थेट केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे पनवेल ते थेट वसई-विरार लोकल प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.
पनवेल-वसई प्रस्तावित नवीन रेल्वे मार्ग सुमारे 69.23 किलोमीटर लांबीचा असणार आहे. या भव्य प्रकल्पासाठी 12,710 कोटी 82 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या संपूर्ण मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी तब्बल 17 नवीन रेल्वे स्थानके उभारली जाणार आहेत. या मार्गामध्ये येणारे महामार्ग (हायवे), खाड्या आणि इतर भौगोलिक अडथळे सहजरित्या पार करण्यासाठी सुमारे 28 किलोमीटरचा मार्ग उन्नत (एलिव्हेटेड/पलायओव्हर) स्वरुपात बांधला जाईल.
पनवेल-वसई महत्त्वाचा कॉरिडॉर मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या (एमयुटीपी-3) अंतर्गत विकसित केला जात आहे. या सेवेमुळे प्रवाशांचा लोकल बदलण्याचा नाहक त्रास संपणार आहे. सध्या पनवेलहून वसई, विरार किंवा पश्चिम उपनगरांमध्ये जाण्यासाठी कोणतीही थेट लोकल सुविधा उपलब्ध नाही. प्रवाशांना दररोज कुर्ला, दादर किंवा इतर जंक्शनवर उतरुन गाड्या बदलाव्या लागतात आणि प्रचंड गदचा सामना करावा लागतो. पनवेल-वसई नवीन मार्ग सुरु झाल्यानंतर पूर्व आणि पश्चिम उपनगरे थेट जोडली जातील.
नवी मुंबई, भिवंडी आणि वसई-विरार पट्ट्यात मागील काही वर्षांत झपाट्याने नागरीकरण झाले असून हजारो नागरिक नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी या पट्ट्यात प्रवास करतात. पनवेल-वसई थेट लोकलमुळे प्रवाशांचा तासन्तासांचा प्रवास वाचणार आहे. त्यामुळे त्यांच्या वेळेची आणि श्रमाची बचत होणार आहे.
- तिसरी आणि चौथी मुंबईसाठी वरदान
वाढत्या लोकसंख्येला आणि भविष्यातील दळणवळणाच्या गरजा लक्षात घेता,तिसरी आणि चौथी मुंबई म्हणून विकसित होत असलेल्या नवीन शहरी क्षेत्रांसाठी (तसेच वाढवण बंदर कनेक्टिव्हिटीसाठी) सदर कॉरिडॉर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या दरम्यान, पनवेल परिसरातील रेल्वे जाळ्याचा विस्तार करताना पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे कॉरिडॉरचे सुमारे 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. आता पनवेल-कर्जतच्या पाठोपाठ पनवेल-वसई लोकल मार्गाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून कधी हिरवा कंदील मिळतो आणि प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते, याकडे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai